By: cine katta | February 22, 2019

रेटिंग - ⭐⭐⭐⭐

लहानपणी आपल्या पाठ्यपुस्तकात एक धडा होता. मिडास राजाचा. तो इच्छा करतो की तो ज्या वस्तूला हात लावेल त्याचं सोनं व्हावं.. त्याची इच्छा पूर्ण होते.. तो ज्या वस्तुला हात लावेल त्याचं सोनं होतं खरं, पण त्यामुळं त्याच्या आयुष्याची मात्र माती होते.. खरं सांगायचं तर ही मिडास राजाची गोष्ट नव्हती, ती आपली गोष्ट होती.. पण आपण मुलांना फक्त धडे शिकवतो, त्याचा मतितार्थ कधी सांगत नाही.. मिडास राज्याच्या गोष्टीचं तात्पर्य एकच होतं.. ‘माणसानं इच्छा जपून कराव्यात..’

उन्मत्त हा साय-फाय चित्रपट नेमकं ह्याच वर्मावर बोट ठेवतो.. ‘स्लीप पॅरेलिसीस’ सारख्या थोड्याशा गुंतागुंतीच्या विषयाला हात घालणारा हा चित्रपट आपल्या काही मुळ संकल्पनांनाच धक्का देऊन जातो.. स्वप्नांचं आभासी जग आणि वास्तव, देव आणि दानव, श्रद्धा आणि सायन्स अशा आपल्याला आजवर गोंधळात टाकणा-या प्रश्नांची उत्तर उन्मत्त मधे सापडत जातात.. कारण ही उत्तर शोधण्याचा दृष्टीकोनच मुळात वैज्ञानीक आहे..

पण ‘सायन्स फिक्शन’ असला तरी विज्ञानकथेच्या चौकटीत अडकवण्याइतकी उन्मत्तची गोष्ट साधी सोपी सरळ नाही.. स्वप्न आणि वास्तव ह्यावरच्या धुसर सीमारेषेवरुन ‘टेलीपॅथीक ड्रीम’ च्या माध्यमातून उन्मत्त आपल्याला एका गुढ जगात घेऊन जातो.. ह्या जगात शिरणं आपल्या हातात आहे, पण इथे घडणा-या घटना मात्र आपल्या नियंत्रणात नाहीत.. इथे कुणा दुस-याचाच राज्य आहे. तो जो कुणी आहे, कदाचीत आपल्या इच्छा पूर्ण करेलही, पण इथेच तर खरी मेख आहे. कारण माणसानं इच्छा जपून कराव्यात कारण इथं त्या पूर्ण होतात.. वरवर पाहता उन्मत्त ही पाच मित्रमैत्रींणींची गोष्ट असली तरी आपल्याच सुप्त मनातली गोष्ट होते.. आणि मग उन्मत्त हा थरारक आणि रोमांचक चित्रपट न राहता तो आंतरबाह्य हदरवुन टाकणारा अनुभव होऊन जातो..

ज्यांना विज्ञानपट आवडतात त्यांच्यासाठी उन्मत्त म्हणजे पर्वणी ठरेलच, पण आपल्याकडच्या चित्रपटात ‘काहीतरी वेगळं शोधणा-या’ चोखंदळ प्रेक्षकांनाही उन्मत्तमधे खूप काही गवसेल.. उन्मत्तची गोष्ट लेखक-दिग्दर्शक महेश राजमाने ह्यांनी अत्यंत समर्थपणे मांडलीये.. मुळात कथेचा गाभा आणि आशयच एक दर्जेदार कलाकृती निर्माण करायला पुरेसा आहेच.. त्यात चित्रपटात येणारे अॅक्शन सिक्वेन्स, अंडरवॉटर सीन्स आणि स्पेशल इफेक्ट चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात..

चित्रपटाची निर्मिती राजेंद्र खैरे यांची असुन, चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन महेश राजमाने यांचे आहे.. संकलनाची जवाबदारी सुद्धा महेश राजमाने आणि राजेंद्र खैरे ह्यांनी पार पाडल्यानं त्याला अपसुकच न्याय मिळाला आहे.. स्वराज घाडगे आणि इंद्रनील नुक्तेंचं छायाचित्रण भारावुन टाकणारं असंच आहे.. चित्रपटात आरुषी, विकास बांगर, पूर्णिमा दे, प्रसाद शिक्रे, संदीप श्रीधर व संजय ठाकूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

खरं तर काही अनुभव शब्दात मांडायचेच नसतात. ते जगुन घ्यावेत. उन्मत्त अशाच पठडीतला चित्रपट आहे. चुकुनही चुकवू नये असा विलक्षण अनुभव. काहीतरी वेगळं पहाण्याऐवजी ‘वेगळं अनुभवावं’ असं वाटत असेल तर ‘उन्मत्त’ व्हायलाच हवं..

Category: Marathi Movie marketing 

Tags:

Comments:

Be the first to comment ...

Post a Comment